...म्हणून मुंबई विमानतळावर `या` विक्रमाची नोंद
यापूर्वीही मुंबई विमानतळाच्याच नावावर अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती.
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर शनिवारी विक्रमी कामगिरीची नोंद करण्यात आली. २४ तासांत या विमानतळावर एकूण १००७ विमानांचं उड्डाण आणि लँडिंग झाल्याची नोंद करण्यात आली. यापूर्वीही मुंबई विमानतळाच्याच नावावर अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती.
उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या म्हणजेच इशा अंबानी हिच्या विवाहसोहळ्यामुळे आंतरराष्ट्रीय खासगी विमानांची संख्या वाढल्यामुळे या विक्रमाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.
विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरुन प्रतितासाला ४८ विमानांचं उड्डाण किंवा आगमन होऊ शकतं. तर दुसरीकडे राखीव धावपट्टीवरुन एका तासाला पस्तीस विमानांचं उड्डाण किंवा आगमन होतं, अशी माहितीही मिळत आहे.
मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा विवाह पिरामल उद्योग समूहाच्या आनंद पिरामल याच्याशी होणार आहे. १२ डिसेंबरला हे दोघंही लग्नगाठ बांधणार असून, त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी आतापासूनच पाहुण्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्वं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिलरी क्लिंटन यासुद्धा भारतता दाखल झाल्या आहेत. तर, अमेरिकन गायिका बेयॉन्से हिसुद्धा इशा, आनंदच्या प्री-वेडिंग सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी भारतात दाखल झाली होती. एकूणच उदयपूर ते मुंबई आणि मुंबई ते उदयपूर या ठिकाणांवरही गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींची मोठ्या प्रमाणात ये-जा पाहायला मिळाली होती.