भाजपकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
तत्कालिन भाजप सरकारवर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यामध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांची सत्तास्थापनेची चर्चा सुरु असताना भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोन रेकॉर्ड केल्याचे आरोप झाले आहेत. या आरोपाची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलीय. भाजपने हातात असलेल्या सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचं फोनवरचं संभाषण ऐकण्यात आलं, असा आरोप आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केले, अशा तक्रारी आल्यात. या तक्रारींची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री देशमुखांनी स्पष्ट केलंय.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'झी २४ तास'च्या 'न्यूज मेकर' या विशेष कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. अनिल देशमुख यांची ही मुलाखत तुम्ही येत्या रविवारी सकाळी १०.३० वाजता, रात्री ८.३० वाजता आणि सोमवारी सकाळी ११.३० वाजता पाहू शकता.