कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: 'कुणी चिल्लर घेताय का चिल्लर ?' असे आवाहन मुंबईत बससेवा देणाऱ्या बेस्टने केले आहे. बेस्टकडे दररोजच्या उत्पन्नातून तब्बल १०-१२ लाख रुपयांची १,२,५ आणि १० रुपयांची नाणी जमा होत असून ती नाणी कोणीतरी घ्यावी आणि त्याबदल्यात बेस्टला नोटा द्याव्यात असे उघड आवाहन बेस्टनं मुंबईकरांना केले आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणातील चिल्लर बँकवाले घेण्यासही तयार नसल्याने बेस्टची डोकेदुखी वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसले की बसमध्ये नेहमीच वाहकासोबत वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळं मुंबईकर आता इतके सुट्टे पैसे घेवून प्रवास करतायत की त्याचा त्रास आता बेस्ट प्रशासनाला होवू लागला आहे. त्यामुळं बेस्टने त्यांच्या तिजोरीत जमा झालेली लाखो रुपयांची चिल्लर कोणतेही जादा दर, कमिशन न आकारता व्यापारी, नागरिक यांना देण्यासाठी काढली आहे.  



तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांनी बेस्ट बसला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. मात्र किमान तिकीट पाच रुपये केल्याने चिल्लरचे प्रमाण वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणं आहे.


बेस्ट उपक्रम त्यांच्या वाहकांना दररोज बस प्रवाशांसोबत पैशांचा व्यवहार करण्यासाठी फक्त १०० रुपयांची नाणी देते. त्याऐवजी वाहकांकडेच जादा नाणी दिल्यास बेस्टचा हा त्रास काही प्रमाणात कमी होवू शकतो.