Ashish Shelar vs Shiv Sena : वरळीच्या मैदानात शेलारांचा ठाकरेंना धक्का
दहीहंडी फोडणं एवढंच भाजपचं लक्ष्य नाहीय, तर महापालिकेच्या सत्तेला (Bmc Elections 2022) सुरुंग लावण्याचाही प्लॅन आहे.
गणेश कवडेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतली एक दहीहंडी (Dahi Handi 2022) जबरदस्त चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय असणार आहे. कारण ठाकरेंच्या मैदानात भाजपनं (Bjp) आव्हान दिलंय. नुसतं दहीहंडी फोडणं एवढंच भाजपचं लक्ष्य नाहीय, तर महापालिकेच्या सत्तेला (Bmc Elections 2022) सुरुंग लावण्याचाही प्लॅन आहे. (mumbai bjp president ashish shelar give challenge to aditya thackeray on dahi handi festival upcoming bmc elections 2022)
जांबोरी मैदानातली यंदाची ही दहीहंडी महापालिकेच्या सत्तेची हंडी ठरणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष होताच आशिष शेलारांनी सर्वात आधी सुरुंग लावायचा ठरवलाय तो वरळीला. आदित्य ठाकरेंच्या त्यांच्याच मैदानात शेलारांनी आव्हान दिलंय. ही हंडी फोडून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत.
वरळीतल्या कोळी बांधवांना आकर्षित करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. वरळीतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचीही भाजपची खेळी आहे.
वरळीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन आहिर असे 3 आमदार आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर याच परिसरातले आहेत. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक वरळीतच राहतात.
असं असतानाही भाजपने जांबोरी मैदान पटकावण्यात यश मिळवलंय. शिवसेना आमदार सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन करतात. यंदा मात्र शेलारांनी जांबोरी मैदान पटकावून अहिर यांच्यावर मात केलीय.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं मिशन १५० ची रणनीती आखलीय. या मिशनची सुरुवात आशिष शेलार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून करतायत. आता वरळीची ही हंडी कोण फोडणार आणि मुंबई महापालिकेत कुणाची घागर उताणी होणार, याची जबरदस्त उत्सुकता आहे.