मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या (सीएसएमटी) परिसरात असणारा हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले होते. दुर्घटनाग्रस्त पूल रेल्वेचाच असून त्याची दुरूस्ती मुंबई महानगरपालिका करत होती. मात्र, पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. यानंतर काही तासांत पालिकेने स्वत:हून हा पूल आमच्याच अखत्यारित येत असल्याची कबुली दिली. त्यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड वर्षांत मुंबईत रेल्वेपुलांवर एवढ्या दुर्घटना घडल्यात की, 'हादसों का शहर' असंच या राजधानीच्या शहराचं वर्णन करता येईल. यातली सर्वात मोठी दुर्घटना २९ सप्टेंबर २०१७ रोजी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात घडली होती. येथील पादचारी रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेत ३९ जण जखमी झाले. त्यापाठोपाठ १५ ऑक्टोबर २०१७ रोजी चर्नीरोड स्थानकाबाहेरच्या रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळून २ जण गंभीर जखमी झाले. ३ जुलै २०१८ रोजी अंधेरीतील रेल्वे पादचारी पूल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, या सगळ्यानंतरही शहरातील प्रशासकीय यंत्रणांनी कोणताही बोध घेतलेला दिसत नाही.


काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आली होती. त्या तपासणीत हा पूल चांगला असल्याचा आणि किरकोळ डागडुजीची शिफारस करणारा अहवाल देण्यात आला होता. तरीही हा पूल पडल्याने दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर संरचनात्मक तपासणीत कसूर झाली असल्यास दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.