कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: महानगरपालिका मुख्यालयात बाऊन्सर्स नेमण्यापाठोपाठ मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल आता एका नव्या वादात सापडले आहेत. कोरोना संकटामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण आलेला असताना दुसरीकडे आयुक्त आपल्या बंगल्यावर मात्र ४० लाख रूपये खर्च करायला निघालेत.ज्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोनाचे संकट कायम असतानाही तो नियंत्रणात आणल्याची टिमकी वाजवणारे मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल आपल्या कारभारामुळं वादात सापडू लागलेत. कोरोना संकटामुळं एकीकडं पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना दुसरीकडं आयुक्त मात्र नको त्या गोष्टीवर वारेमाप खर्च करत सुटलेत. पालिकेचे सुरक्षा कर्मचारी असतानाही स्वत:च्या कार्यालयाबाहेर खासगी बाऊन्सर्स नेमण्याचे प्रकरण अंगलट आल्यानंतर आता ते पेडर रोड भागातील आयुक्त बंगल्यावर ४० लाख रूपये खर्च करण्यास निघालेत. त्यासाठी बंगला दुरूस्तीचे टेंडरही काढण्यात आलंय. 

धक्कादायक म्हणजे कोवीडमध्ये तात्पुरतं कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पालिका त्यांचे वेतन तीन तीन महिने देत नाही. परंतु दुसरीकडे आयुक्त मात्र स्वत:च्या बंगल्यावर लाखो रूपये खर्च करतायत. तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त अजोय मेहतांनी या बंगल्यावर ५० लाख रूपये खर्च केले होते. मग आता लगेच ४० लाखांचा खर्च करण्याची गरज काय ? असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत. गेल्या आठ वर्षात आयुक्तांच्या बंगल्यावर तब्बल पावणे दोन कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. २०१२ मध्ये सिताराम कुंटे आयुक्त होते तेव्हा २९.२९ लाख रुपये खर्च झाला होता. २०१६ मध्ये अजोय मेहता आयुक्त असताना ५० लाख रुपये खर्च झाला. तसेच मध्यंतरी आणखी काही कामासाठी ९७ लाख रूपये खर्च केल्याची माहिती आहे.