मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुरुवातील केवळ परदेशी नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये परदेशी प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या लोकांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यापैकी अनेक संशयित झोपडपट्टीच्या दाट लोकवस्तीत राहणारे आहेत. यामध्ये वरळी- कोळीवाडा आणि दहिसरचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणाव कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील १४६ परिसर सील केले आहेत. हे परिसर बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आले आहेत. तसेच या भाागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या जात आहेत.
 
यामध्ये दक्षिण मुंबईतील ४८ जागा आहेत. मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा यामध्ये समावेश आहे. तर पश्चिम मुंबईतील  ४६ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम, हिल रोड, एसव्ही रोड, वांद्रे गव्हर्मेंट कॉलनी, बिंबिसार नगर यांचा समावेश आहे. तर पूर्व मुंबईतील एकूण ४८ परिसरांमध्येही पालिकेकडून अशीच खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये चेंबूर आणि घाटकोपरमधील ३५ ठिकाणांचा समावेश आहे.
 
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३२० वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील १६ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. आगामी काळात क्वारंटाईनसाठी जागा कमी पडल्यास पालिकेने हॉटेल, वसतिगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाजे (क्रूझ), महाविद्यालये, क्लब इत्यादी आस्थापनांच्या इमारती ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे.