मुंबई: सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेकडून सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे सध्या सायनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रमेश भारमल हे आता २४ तास रुग्णालयातच राहणार असल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णाचा खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न


 


तसेच रमेश भारमल यांच्यावर कुपर हॉस्पिटल आणि एच.बी.टी मेडिकल कॉलेज यांच्यावर देखरेख ठेवण्याचीही जबाबदारी असेल. याशिवाय, सरकराने सायन आणि कुपर रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आयएएस प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर लगेचच प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 
काही दिवसांपूर्वीच सायन रुग्णालयातून एका रुग्णाने खिडकीतून उडी मारून पळून जायचा प्रयत्न केला होता. यानंतर आमदार नितेश राणे यांनी सायनमधील धक्कादायक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हीडिओ वॉर्ड नंबर ५ मधील असल्याचे सांगितले जाते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.