कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बील) होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ३७ रुग्णालयांतील ६२५ तक्रारींचा निपटारा   करण्यात आला आहे. तसेच इस्पितळात नेमून दिलेल्या लेखा परीक्षकांनी अन्य ४९० तक्रारींमध्ये देखील कार्यवाही केली आहे.  अशा एकूण १,११५ तक्रार प्रकरणात नियमानुसार कार्यवाही केल्याने सुमारे १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपये रकमेची आजवर परतफेड करण्यात आली आहे. यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या १,११५ प्रकरणातील मूळ देय रक्कम एकूण १४.०१ कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणांमध्ये झालेल्या तक्रारी आणि सूचना यांचा विचार करून लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी सर्व नियम तपासून कार्यवाही केली. तपासणी आणि पडताळणी अंती या देयकांची योग्य फेर आकारणी करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या. परिणामी या सर्व प्रकरणातील बिलांची रक्कम कमी होऊन १२.५४ कोटी रुपये इतकी झाली. मूळ देयक आकारणीचा विचार करता सुमारे १०.४८ टक्क्यांनी देयकांची रक्कम कमी होवून रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोविड कोरोना १९'ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेण्याचे ठरविले. या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी केली पाहिजे याबाबत राज्य शासनाने दिनांक ३० एप्रिल २०२० रोजी आदेश काढला. या आदेशात आणखी सुधारणा करून सुधारित आदेश दिनांक २१ मे २०२० रोजी जारी करण्यात आले. 

या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. असे असले तरी खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. या नियुक्तीमुळे बिल आकारणी बाबत तक्रारींचा निपटारा होत आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत तक्रारींचा ओघ बऱ्याच अंशी कमी करण्यात यश आले आहे.

एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकार्‍यांकडे ईमेलद्वारे थेटपणे तक्रार नोंदविता येते.