मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोटनिवडणूक
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. १३ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. १३ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक २१ च्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तर प्रभाग क्रमांक ६२ मधील चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या दोन्ही प्रभागातील रिक्तपदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
दरम्यान, मुलतानी यांच्या जागी शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राजू पेडणेकर यांच्याबाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने येथे पोट निवडणूक जाहिर केली आहे. येथे निवडणूक होत असल्याने शिवसेनेला मोठा धक्का आहे.
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने आधी वाद पेटला असताना घेण्यात येणारी ही निवडणूक फारच महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेला इथे आपली जागा कायम राखता येणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.