घरात प्राणी पाळताय? तुरुंगात जावं लागणार नाही, याची काळजी घ्या...
पाळीव प्राणी अनेक घरात पाळलेले आढळतात. मात्र हेच पाळीव प्राणी तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतात.
सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : पाळीव प्राणी अनेक घरात पाळलेले आढळतात. मात्र हेच पाळीव प्राणी तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतात.
कफ परेडच्या जॉली मेकर इमारत... सकाळी साडे सातची वेळ... साँसी नावाच्या कुत्रीला खाली नेण्यासाठी तिची केअर टेकर लिफ्ट समोर उभी आहे.... लिफ्ट येते खरी मात्र लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर त्यातून आधीच आलेल्या लेक्सी नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने साँसीवर हल्ला केला... साँसीला अक्षरशः खाली पाडलं... तिचा गळाच धरला.
कुत्र्यासोबतच्या केअरटेकरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही दाद दिली नाही... लिफ्टमननेही कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तोही त्याला रोखू शकला नाही. या हल्ल्यात साँसीसह लिफ्टमनही जखमी झाला.
या हल्ल्यात साँसी जखमी झाली. तिचे मालक आस्पी चिनोय यांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण 15 दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या कुत्र्याचा मालक तरूण बाली आणि केअर टेकर लक्षमण साहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळीव प्राण्यांची सगळी जबाबदारी ही त्यांच्या मालकांची असते. मात्र पाळीव प्राणी दुसऱ्या कोणालाही त्रास देणार नाही याची मोठी जबाबदारी आहे. कुत्र्याने कुत्रीचा जीव घेतला एवढ्यापुरतं हे मर्यादीत नाही... तर हा हल्ला किती भयानक होता आणि कुत्र्यांना विशेष ट्रेनिंग किती गरजेचं आहे, हे अधोरेखित करणारा आहे.