मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात लिफ्टमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू
या घटनेप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी दुपारी लिफ्टमध्ये अडकून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. रामानंद पाटकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याठिकाणी लिफ्टची दुरुस्ती सुरु असताना हा प्रकार घडला. एसटीच्या सिव्हील इंजिनीअर डिपार्टमेंटमध्ये कामाला असणारे रामानंद पाटकर ही लिफ्ट दुरुस्त करत होते. मात्र, काम सुरु असताना लिफ्ट अचानक सुरु झाली. त्यामुळे रामानंद पाटकर यांचे दोन्ही पाय आणि डोके लिफ्टमध्ये अडकले. यामध्ये रामानंद पाटकर गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत प्रथम नायर रुग्णालयात आणि नंतर व्होकार्ड रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही लिफ्ट दुरुस्तीच्या कामावेळी एका कर्मचाऱ्याचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता. मात्र, यानंतरही एसटी प्रशासनाच्या कारभारात तसूभर फरक पडलेला नाही.
दरम्यान, या घटनेप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रुग्णालयात रामानंद पाटकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. मात्र, या घटनेविषयी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिव्हील इंजिनिअर डिपार्टमेंटच्या प्रमुखांविरोधांत कारवाई करण्याची मागणी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.