55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश
भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घतेला आहे. वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या आहे.
मुंबई : 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत (Traffic Police) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेडस तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (IPS officer Vivek Phansalkar) यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुख्यमंत्री शिंदे दुपारच्या वेळेस ठाणे इथून मुंबईकडे जात असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचं त्यांनी पाहिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसंच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.
यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतुक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.
ठाण्यात वाहतूकीत बदल
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे शहरातील (Thane City) सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कामं केली जात आहे. मात्र त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत. शहरातील अंतर्गत भागातील महत्वाच्या आशा एलबीएस मार्ग तसंच अन्य काही रस्त्यांवर टेम्पो, बसगाड्या तसंच जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून तिथली वाहने अन्य ठिकाणी वळवण्यात येणार आहेत.
आधीच मुंब्रा बायपास,साकेत ब्रिज इथल्या कामांमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर मार्गवर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे..त्यातच रस्त्यांची कामे शहराच्या अंतर्गत भागात सुरु असल्याने शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 15 दिवसांसाठी हे बदल लागू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिलीय. त्याचप्रमाणे प्रचंड वाहतूक असणाऱ्या तीन हात नाका इथंही वाहतुकीच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले असून बाहेरगावी जाणाऱ्या खासगी लक्झरी बसेसना उभं राहण्यास मनाई करण्यात आलीय.