Mumbai News : कोस्टल रोडलगत आणखी एक नवा मार्ग; मात्र तज्ज्ञांना वेगळीच चिंता, कारण...
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली असतानाच आता या मार्गाच्या अवतीभोवती केलं जाणारं इतर बांधकामही चर्चेचा विषय ठरत आहे.
Mumbai Coastal Road : 2024 हे वर्ष अनेक कारणांनी महत्त्वाचं ठरणार असून, वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याची प्रचिती येऊ लागली. मुंबई शहराचा कायापालट होण्यासही याच वर्षात सुरुवात झाली. वर्षाच्या पहिल्याल महिन्यात देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. ज्यामागोमाग आता शहरातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडच्या एका टप्प्याचंही लोकार्पण करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच (Worli To Marine Drive) वरळी ते मरिन ड्राईव्हदरम्यानचं अंतर कमी करणारी कोस्टल रोडची एक मार्गिका वाहनांसाठी सुरु करण्यात आली. लवकरच या मार्गावरील इतर मार्गिकाही टप्प्याटप्प्यानं प्रवासासाठी खुल्या केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी आणखी एका नव्या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका आशावादी दिसत आहे.
काय आहे हा प्रकल्प?
संपूर्ण कोस्टल रोड सेवेत आणण्यासाठीच्या कामांना वेग आलेला असतानाच आता महापालिकेच्या वतीनं 70 एकर भूखंडाचा विकास करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गालगत असणाऱ्या साधारण 7.5 किमी अंतरावरील भागात मियावाकी जंगल, म्युझिकल फाऊंटन आणि इतरही सुविधा पुरवण्यात येणार आहेत. इथं 15 किमी अंतराचा सायकल ट्रॅक असून, हा भाग तीन विविध भागांमध्ये जोडण्यात येणार असून, नेचर कोव, पार्क लाईन, ग्रीन शोर असे हे तीन भाग असतील असं वृत्त TOI नं प्रसिद्ध केलं आहे.
हेसुद्धा वाचा : Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
कोस्टल रोडलगत साकारण्यात येणारी पार्क लाईन, वरळी सी फेसपासून सुरु होऊन वरळी जेट्टीपर्यंत जाणार आहे. तिथून नेचर कोव हा टप्पा सुरु होणार असून, पुढे ग्रीन शोवचा टप्पा थेट प्रियदर्शनी पार्क इथं संपणार आहे. पालिकेच्या या आराखड्याविषयीची ब्लू प्रिंट गुरुवारी पालिका मुख्यालयात सादर करणअयात आली. पालिका प्रशासन आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विचारात असतानाच तज्ज्ञ आणि वास्तुविशारदांनी मात्र या प्रकल्पास काही हरकती दर्शवल्याचं म्हटलं जात आहे.
तज्ज्ञांना नेमक्य़ा कोणते प्रश्न सतावतायेत?
कोस्टल रोडला लागून असणाऱ्या भागात उभारल्या जाणाऱ्या पदपथालगतच्या बफर झोनची उंची नेमकी किती असेल? कोस्टल रोडला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत नेमकं किती प्रमाणात वृक्षारोपण केलं जाईल? या साऱ्याची जबाबजदारी कोण घेणार आहे? असे प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आले. इतकंच नव्हे, तर पदपथ साधारण 100 फुटांचं असणार आहे, त्यामुळं त्याची काळजी कशी घेणार? असेही काही प्रश्न मांडण्याच आले आहेत. दरम्यान, तज्ज्ञ मंडळींनी त्यांचे प्रश्न आणि अडचणींचे मुद्दे यासह सूचनाही द्यावात ज्यावर सकारात्मक चर्चा केली जाईल असं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सुचवल्याचं म्हटलं जात आहे.