मुंबई : कोरोना संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. मात्र, कोरोनाविरोधात लढताना पोलिसांची महत्वाची भूमिका ठरत आहे. दरम्यान, काही पोलीस हे कोरोनाने संक्रमित झाले आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने आणि त्यांना सुट्टी नसल्याने पोलिसांवर ताण येत आहे. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जे जे मार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली. कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून सातत्याने काम करत असणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी परमबीर सिंग यांनी या वेळी पोलिसांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस दलात जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे सर्वाधिक २७ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर एकूण मुंबई पोलीस दलात २५० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तीन पोलिसांचा कोरोना मुळे मृत्यू झालाय. अंडरवर्ल्डचा खात्मा असेल किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला, मुंबई पोलीस प्रत्येक युद्ध जिंकली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातला लढाही जिंकणार असल्याचा विश्वास परमबीर सिंग यांनी व्यक्त केला. 


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. काल  १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात गुरुवारी  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.