मुंबई: मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये सुरु झालेला अंतर्गत वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या वादात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाई जगताप यांनी ट्विटरवरून संजय निरुपम यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. काहीजण स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात मात्र ते जातीयवादी आणि भाषेचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. मात्र, इतके करुनही ते २.७० लाख मतांनी पराभूत होतात. अशा कर्मठ नेत्यांपासून सावध राहायला पाहिजे, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 



मिलिंद देवरा यांनी रविवारी राजीनामा देताना मुंबईत प्रदेशाध्यक्षाऐवजी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्याचा पर्याय व्यवहार्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे पक्षाचे अधिक नुकसान होईल, असा इशारा देवरा यांनी दिला होता. यावरुनच निरुपम यांनी देवरा यांना लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, राजीनामा हा त्यागाच्या भावनेतून दिला जातो. इकडे दुसऱ्या क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे का वरती जायची शिडी? पक्षाला अशा कर्मठ लोकांपासून सावध राहायला पाहिजे, असे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.