व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसने काढले राज्य सरकारचे वाभाडे
भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असल्याचा आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसनं केला आहे.
मुंबई: भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक होत प्रदेश काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारचे येथेच्छ वाभाडे काढले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यात राज्यातील फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षांनी पुराव्यासह अनेकदा उघड केली. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असल्याचा आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसनं केला आहे.
भ्रष्टाचाराबद्दल मौन हा दांभिकपणा
सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी अगोदरच दिलेली क्लिनचीट आणि आता बाळगलेलं मौन हा सरकारचा दांभिकपणा आणि भ्रष्टाचाराला असणारा पाठिंबा अधोरोखित करणारा असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय... यासंदर्भात संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे व्यंगचित्र जाहीर केलंय.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पुराव्यासह उघड केलेल्या प्रकरणांत भ्रष्टाचार सिध्द असतानाही मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचीट देतात. सुभाष देशमुख प्रकरणी सरकारचा दांभिकपणा दिसतो. भ्रष्टाचाराच्या पर्वतावर उभे राहत पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपा सरकारबद्ल @INCMaharashtra तर्फे व्यंगचित्र.