प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : राग हा माणसाचा शत्रू आहे आणि हाच राग माणसाला कोणत्या थरावर नेऊ शकतो. याचचं ताजं उदाहरण मुंबईतील अंधेरी (Andheri) एम आय डी सी परिसरात पाहायला मिळाले. जेवणावरुन झालेल्या वादामुळे एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी एमआयीडीसी परिसरातील हॉटेल रेसिडेन्सीमध्ये जेवणाला नावं ठेवल्यामुळे हॉटेलच्या कुकने वेटरची हत्या (Cook kills waiter) केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी सुरेण रोडवर असलेल्या हॉटेल रेसिडेन्सीमध्ये वेटर जगदीश जलाल याने कुक माधव मंडल याला जेवण बनवण्यास सांगितले होते. मात्र कुकने  चुकीचे जेवण बनवल्याचे वेटर जगदीश जलालने म्हटल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचा राग मनात धरुन कुकने वेटरची हत्या केली आहे. माधव मंडल याने किचनमध्ये भाजी कापायच्या धारदार चाकूने वेटर जगदीशच्या छातीत आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात जगदीशचा मृत्यू झाला.


गुरुवारी रात्री वेटर जगदीशने कुक माधव मंडलकडे जेवण बनवण्याची ऑर्डर दिली होती. जेवण चुकीचे बनवल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यामध्ये त्यावेळी किरकोळ मारामारी देखील झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीही दोघांमध्ये वाद सुरु होता. सकाळी आठ वाजता कुक माधव मंडलने वेटरच्या छातीत वार केले. त्यानंतर तात्काळ वेटरला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कुक माधव मंडल याने हत्या केल्यानंतर याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला दिला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन आरोपी माधव मंडळ याला अटक केली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.