मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्गाचं प्रमाण रोखल्याचं जगातुन कौतूक होतंय पण आता गाफील राहू नका असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.  मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीस परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. एस चहल उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई सारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहरातील कोरोना संसर्ग आपण रोखला. आपण कोणतीही माहिती लपवत नसल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतलीय. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतूक केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


जगभरात सुरु असलेल्या निरीक्षणानुसार आता दुसऱी लाट येईल असे म्हटले जाते. त्यामुळे आपले प्रयत्न आणखी तीव्रतेने आणि प्रभावीपणे राबवा असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावे लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरवातीला कोरोना शहरात होता. पण आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. 



हळूहळू आपण मुंबई खुली करतो आहोत. मुंबईला तुम्हा सर्वांच्या अनुभवातून पुर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी यंत्रणांना आणखी सतर्क करा. वॅक्सीन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 


मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नाचा त्यांनी उल्लेख केला. त्याठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर आदी अनुषंगीक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात असे ते म्हणाले.


आगामी सण वार आणि उत्सवाच्या काळात कोरोनाच्या अनूषंगाने दक्षता घेण्याचे आणि त्याबाबत वेळोवेळी नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना वेळेत पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 


रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅश बोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबीरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.