आनंदाची बातमी: मुंबईचा कोरोना डबलिंग रेट आणखी सुधारला
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत मात्र Covid-19 चा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, शनिवारी मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट आणखी सुधारला. आता मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालवाधी ५४ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरातील परिस्थितीही आता नियंत्रणात आली आहे. धारावीत शनिवारी कोरोनाचे केवळ सहा नवे रुग्ण आढळून आले. मात्र, दादर आणि माहीम परिसरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दादरमध्ये ३२ तर माहीम परिसरात कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळून आले.
चिंताजनक... २४ तासांत करोनाचे ३४,८८४ नवे रुग्ण
तसेच मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आर मध्य विभाग वगळता इतर सर्व विभागातील रुग्णवाढीचा सरासरी दर दोन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे. आर मध्य विभागात रुग्णवाढीचे सरासरी प्रमाण अडीच टक्के इतके आहे. तर मुंबईच्या २४ पैकी १५ विभागात रुग्णवाढीचा सरासरी दर १.३० किंवा त्यापेक्षाही खाली आला आहे.
'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही', अजितदादांची तंबी
दरम्यान, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. एक्टिव्ह रुग्णसंख्येच्याबाबतीत पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. याशिवाय, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.