मुंबई: सध्याच्या घडीला मुंबई उपनगरांतील अनेक वॉर्डांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जुलैच्या मध्यापर्यंत शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात येईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ३६ दिवसांवर आला असून वरळी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. खाटा, रुग्णवाहिका, डॉक्टर, उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आपण याच वेगाने काम करत राहिलो तर जुलैच्या मध्यापर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असे चहल यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती. मात्र सुदैवाने ३ जून ते २२ जून  म्हणजे मागील १९ दिवसात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणातच आहे. मात्र, मुंबईतील सहा ते सात वॉर्डांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली तसेच भांडुप, मुलुंड या परिसराचा समावेश आहे. मात्र, येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये येथील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 
महापालिकेने 'मिशन झीरो' म्हणजेच शून्य रुग्ण मोहीम राबवायला सुरु केली आहे. या अंतर्गत रुग्णांचा शोध व उपचारासाठी ५० फिरते दवाखाने तैनात करण्यात आले आहेत. संशयित रुग्णांची जागेवरच कोरोना टेस्ट अर्थात चाचणी केली जाईल. यातून बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांना वेगळे केल्यास विषाणूची साखळी तोडण्यास मदत होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. 

तसेच मे महिन्याच्या तुलनेत मुंबईत डॉक्टर्स आणि वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे.  आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेपर्यंत १५ हजार तर जुलै अखेपर्यंत २० हजार रुग्ण शय्या उपलब्ध असतील. तसेच डॉक्टर्सच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांना मानधन पाचपट वाढवून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागातून डॉक्टरांना मुंबईत आणले. मे महिन्यातील १०० च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे, असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.