Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेने (Crime Branch) शुक्रवारी संध्याकाळी गुंड इलियास बचकाना (Ilyas Bachkana) याला अटक केली. मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडजवळ इलियासला अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने एका अपहरण प्रकरणाचे गूढ उकलत इलियास बचकाना याला बेड्या ठोकल्या आहे. इलियास बचकाना याने त्याच्या साथीदारांसह एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने डम्पिंग ग्राऊंडजवळील बांधून मारहाण करण्यात आलेल्या या बिल्डरची सुटका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलियास बचकाना याने हिफजुल रेहमान नावाच्या बिल्डरचे अपहरण केले होते. तसेच त्याच्या कुटुंबीयांना बोलावून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न मिळाल्याने आरोपी इलियासने रेहमानला बेदम मारहाण केली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला होता. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी रेहमानची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रेहमान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


30 हून अधिक खटले असलेला इलियास बचकाना गेल्या आठवड्यात जामिनावर बाहेर आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बिल्डर हिफजुर रेहमान अन्सारी भायखळा येथे असताना गुरुवारी रात्री ही घटना घडली. रात्री 9.30 च्या सुमारास त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारमधील व्यक्तीला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगून एक व्यक्ती अन्सारी यांच्याजवळ आला. अन्सारी कारजवळ गेल्यावर त्या व्यक्तीने त्यांना आत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने अन्सारींवर जोरदार हल्ला केला आणि त्यांना घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.


त्यानंतर अन्सारी यांच्या मुलाला एका व्यक्तीने घडलेला प्रकार सांगितला. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास, अन्सारी कुटुंबियांना एका व्यक्तीचा फोन आला ज्याने आपण इलियास बचकाना बोलत असल्याचे सांगितले. हिफजुर अन्सारी जिवंत हवा असल्यास 10 कोटी रुपये द्या अशी धमकी इलियासने अन्सारी कुटुंबियांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या अन्सारी कुटुंबियांनी थेट भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तक्रार प्रात्प होताच गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 


दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द परिसरात बिल्डरचा माग काढला. अखेर त्यांना डम्पिंग ग्राऊंडजवळील एका खोलीत हिफजुर अन्सारी बांधलेल्या अवस्थेत सापडले. त्यांना रात्रभर बेदम मारहाण झाल्याचे गुन्हे शाखेला आढळलं. त्यानंतर पोलिसांनी इलियास आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. बाकीच्या आरोपींना पकडण्यासाठी पथकाने शोध सुरु केला आहे.