`सकाळचा भोंगा बंद करा, अन्यथा...`; शरद पवारांनंतर संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी
Sanjay Raut Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना धमक्या आल्या नंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोघांनाही गोळी घालेन असे धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.
Maharashtra Politics : राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर चिखलफेक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीच्या (MVA) तीन महत्त्वाच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धकमी देण्यात आली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
काय म्हटलंय धमकी देणाऱ्याने?
"संजय राऊत यांनी सकाळचा भोंगा बंद करावा नाहीतर त्यांना गोळी घालेन. संजय राऊत यांना फोन उचलायला सांग ते घाबरले आहेत का? दोन्ही भावांना गोळी घालेन. दोघांना स्मशानात पाठवेन. एका महिन्याच्या आता दोघांनाही गोळी मारेन," असे धमकी देण्याऱ्याने म्हटलं आहे.
काय म्हणाले सुनील राऊत?
"हा धमकीचा फोन काल संध्याकाळी आला होता. माझ्या मोबाईलवर तीन ते चार वेळा फोन करण्यात आले होते. संजय राऊत यांनाही फोन येत होते. आज शरद पवार यांनाही धमकीचा फोन आलेला आहे. जे सरकारच्या विरोधामध्ये बोलतात अशा सगळ्यांना असे फोन येत आहेत. सकाळची पत्रकार परिषद बंद करा नाहीतर दोघांनाही गोळ्या घालू अशी काल धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांना यापूर्वीही धमकीचे फोन आले होते. पण सरकार याबाबत गंभीर नाही. शरद पवार यांना आलेल्या धमकीचे प्रकरणही सरकार गंभीरतेने घेणार नाही याची मला खात्री आहे," असे सुनील राऊत म्हणाले.
शरद पवार यांनाही धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्वीटरवरुन शरद पवार यांना 'लवकरच तुमचा दाभोलकर होईल' अशी धमकी देण्यात आली आहे. यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून "तुमचाही दाभोलकर होणार", अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवार यांच्या आजाराबाबतही भाष्य करण्यात आले आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी माझे वडील शरद पवार यांना कोणत्याही प्रकारे त्रास झाला तर त्याला गृहमंत्रालय जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.