Drug Smuggler Lalit Patil Arrested : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनीच ललित पाटीलचा नाशिकमधला (Nashik) ड्रग्स कारखाना (Drugs) उद्ध्वस्त केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे.



ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या लोकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले होते.


ललित पाटील जाणार कुठे, त्याला शोधून काढणारच - देवेंद्र फडणवीस


पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेल्या ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार असला तरी जाणार कुठे? या प्रकरणात काही लोकांना अटक झाली आहे. त्यालाही होईल. अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आता ललित पाटीलला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे.