अधिकाऱ्याला भेटायचे सांगून मॅकडोनाल्डमध्ये न्यायचे अन्...; परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची मुंबईत लूट
Mumbai Crime : मुंबईत परदेशात जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत धक्कायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Crime : परदेशात पाठवण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा मुंबईतील साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारचा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलीस याप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली होती का याचा तपास करत आहेत.
डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले की, पंजाबमधून परदेशात पाठवण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भावांचे अपहरण, मारहाण आणि दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील तपास सुरू केला होता. त्याप्रकरणी आता आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी तीन ट्रॅव्हल एजंट आहेत, तर बाकीचे पाच त्यांचे ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे एजंट दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये राहणाऱ्या लोकांना आपला बळी बनवायचे. जेणेकरुन गुन्हा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेता येणार नाही.
परदेशात नोकरीची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या लोकांशी संपर्क साधून आरोपी त्यांना परदेशात पाठवू, असे आश्वासन देऊन फसवायचे. आरोपी आम्ही तुम्हाला परदेशात पाठवू, तिथे नोकरी मिळेल, याशिवाय व्हिसा आणि इमिग्रेशनही करून देऊ, असेही आश्वासन द्यायचे. त्या बदल्यात आरोपी 11 हजार डॉलर्सची मागणी करायचे. ती व्यक्ती तयार झाल्यावर ही टोळी विमानतळावर अधिकाऱ्याला भेटण्याच्या बहाण्याने त्याला मुंबईला बोलावून निर्जनस्थळी घेऊन जायचे आणि लुटायचे.
पंजाबमधील अभिषेक कुमार आणि त्याचा भाऊ हिमांशू कुमार हे दोघे सख्खे भाऊ देखील या प्रकाराला बळी पडले होते. 7 डिसेंबर रोजी पहाटे 12.30 च्या दरम्यान दोघेही साकीनाका परिसरातील एका हॉटेलजवळ दोघांना लुटण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. ही टोळी मुंबईतील अनेक ट्रॅव्हल्स एजंटना विश्वासात घेऊन परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची माहिती घेत असे. या टोळीने आतापर्यंत सुमारे चार जणांना अशाप्रकारे लुटल्याचे समोर आले आहे.
या टोळीने फिर्यादीला इटलीत नोकरीचे आश्वासन दिले होते. सर्व तयारीनंतर या टोळीने तक्रारदाराला पंजाबमधून मुंबईत बोलावून हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. आरोपी बनावट नंबर प्लेट असलेली कार घेऊन हॉटेलजवळ यायचे. इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटण्याच्या बहाण्याने ते त्यांना मुंबईपासून दूर पनवेल येथे घेऊन जायचे आणि नंतर त्यांना बेदम मारहाण करायचे आणि नंतर भीती दाखवून लुटायचे. आरोपी आधी खात्री करायचे की कोणत्या व्यक्तीकडे पैसे आहेत. याच्या आधारे ते योजना आखत आणि परदेशात जाण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी नेत लोखंडी रॉडने मारहाण करत. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जायचे.
कसे करायचे फसवणूक?
आरोपी पीडितांना 11 हजार डॉलर (9 लाख 17 हजार) अधिकाऱ्याला द्यायचे आहेत असे सांगायचे. आरोपी पीडितांना विमानतळाजवळ हॉटेल बुक करायला सांगायचे. खरोखरच अधिकाऱ्याला भेटायला जात आहेत याची खात्री करण्यासाठी आरोपी बनावट नंबर असलेली इनोव्हा कार घेऊन हॉटेलच्या खाली पोहोचायचे. त्यानंतर हॉटेलमधून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पीडितांना नवी मुंबईतील मॅकडोनाल्डमध्ये घेऊन जायचे. त्यानंतर निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपी त्यांना मारहाण करून पैसे, सोने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू घेऊन पळून जायचे. साकीनाका पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने इनोव्हा कारच्या बनावट क्रमांकाच्या मदतीने आठही आरोपींना अटक केली असून, इनोव्हा कारही जप्त केली आहे.