प्रथमेश तावडे, झी मीडिया, मीरारोड : मुंबईतल्या (Mumbai) मीरारोड परिसरात चोरीची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मीरारोडमध्ये बहिणीच्या घरात 26 लाख 60 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपी भावाला मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. (brother stole lakhs of rupees from his sister house)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरमान जावेद खान असं या आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. आरोपी फरमान याला आपल्या छोट्या बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या बहिणीने घरात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने ठेवल्याची माहिती मिळाली होती. बहीण आणि  तिच्या कुटुंबातील सदस्य एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार असल्याची माहिती त्याला होती, त्याआधारे आरोपीने 4 नोव्हेंबरला रात्री घरी कोणी नसताना त्याने बहिणीच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 26 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.


बहिण आणि तीचं कुटुंब बाहेरगावाहून परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. मीरारोड पोलिसांना या चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. ज्यात तांत्रिक बाबींचा तपास करत ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. 


या गुन्ह्याचा अधिक तपास केल्यानंतर ही चोरी  फिर्यादीच्या भावानेचं केल्याचे उघड झालं. चोरी केल्यानतंर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात होता. पण वलसाड रेल्वे स्थानकात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे. त्याकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास केला जातं आहे.