Crime News : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारी गुजरातमधील वडोदरा-अहमदाबाद महामार्गावरून (Vadodara-Ahmedabad Highway) महाराष्ट्राचे माजी पोलीस उपायुक्तांच्या मुलाचा मृतदेह (Crime News) ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. माजी पोलीस उपायुक्त वसंत कांबळे यांचा मुलगा 44 वर्षीय विशाल कांबळे यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मालमत्तेच्या वादातून विशाल कंबळे यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांनी विशाल कांबळ यांचे त्याच्या आईसह अपहरण केले होते. त्यानंतर विशाल कांबळे यांची हत्या केली आणि त्यांच्या आईला एका खोलीत डांबून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच आरोपींना अटक केली असली तरी दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी विशाल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनासाठी मुंबईत आणला आहे. मुख्य आरोपी, विशाल कांबळेचा चुलत भाऊ प्रणव रामटेके (25) याने चार महिन्यांपूर्वी आई-मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता, असे पोलिसांनी सांगितले.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कांबळे यांच्या मालकीचा पाच एकरचा भूखंड आणि बंगला यापैकी कोणचाही वाटा न दिल्याने आपल्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा रामटेकेने केला आहेत. आम्ही जमिनीची काळजी घेत होतो आणि आम्हाला वाटा मिळेल अशी आशा होती. पण तसे झाले नाही, असे आरोपीने म्हटलं आहे. कोल्हापुरातील आर के नगर इथे विशाल वसंत कांबळे राहत होते. कोल्हापूर येथून विशाल कांबळे हे त्यांची आई रोहिणी कांबळे यांच्या सोबत मुंबईत कोर्टाच्या कामासाठी आले होते. मात्र 5 एप्रिलपासून ते बेपत्ता होते. विशाल यांच्या मावशीने 21 एप्रिल रोजी चेंबूर पोलीस ठाणे गाठून रोहिणी व विशाल हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चेंबूर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.


तपासानंतर चेंबूर पोलिसांनी रोहिणी कांबळे यांचा भाचा प्रणव रामटेकेसोबत मालमत्तेवरुन वाद सुरु असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी प्रणव रामटेके याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. आरोपी प्रणवने आपल्या साथीदारांसोबत विशाल कांबळे आणि त्यांच्या आईचे अपहरण केले होते. विशाल यांना आरोपींनी गुंगीचे औषध पाजून पनवेलमधील एका व्हिलामध्ये नेऊन मारून टाकले. त्यानंतर त्याचा मृतदेह वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर नेऊन टाकला होता. तर आरे कॉलनी येथे भाड्याची खोली घेऊन रोहिणी कांबळे यांना तिथे डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रोहिणी कांबळे यांची सुटका केली.


प्रणवचा रोहिणी कांबळे यांच्या कोल्हापुरातील पाच एकर शेतीचा भूखंड आणि कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यावर डोळा होता. यावरुनच त्यांच्यात वाद देखील सुरु होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते. आरोपी प्रशांतने रोहिणी व विशाल यांच्या नावे असलेली मालमत्ता हडप करण्यासाठी दोघांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार प्रणवने विशालला आईसह प्रॉपर्टी पाहण्यासाठी पनवलेला बोलवले होते. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने प्रणवने विशालची हत्या केली आणि मृतदेह गुजरातमध्ये नेऊन टाकला.


दरम्यान, चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी प्रणव रामटेके याच्यासह ज्योती सुरेश वाघमारे (33), तिचा पती रोहित अनिल उडाणे उर्फ मुसा पारकर (40) आणि मुनीर अमीन पठाण (41) आणि राजू बाबू दरवेश यांना अटक केली. पोलिस या प्रकरणी एका महिलेसह आणखी दोघांचा शोध घेत आहेत.