Mumbai Crime : मुंबईतून (Mumbai News) दोन हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. जोगेश्वरीत नराधाम बापांनी पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी (Mumbai Police) आरोपी बापांना अटक केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार झालेल्या दोन्ही मुली या अल्पवयीन होत्या. परिसरात या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या या काळीमा फासणाऱ्या घटनांमुळे पोलिसही हादरले आहेत. जोगेश्वरीत जन्मदात्या बापांनीच आपल्याच मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे. जोगेश्वरी पश्चिम आणि जोगेश्वरीतील बडी मस्जिद परिसरात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही नराधम बापांना अटक केली असून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथे एका नराधम बापाने पोटच्या 13 वर्षीय मुलीला तुला मारुन टाकेन अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मुलीच्या आईला कळताच तिने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.


दुसरी घटना ही जोगेश्वरीच्या बड्डी मस्जिद परिसरात घडली आहे. इथे राहणाऱ्या एका 52 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झालं आहे. नराधम बापाने मुलगी झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केला आहे. मुलीने तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.


दरम्यान, दोन्ही पीडित मुलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


आठवड्याभरापूर्वीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार


दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच जोगेश्वरी परिसरात एका 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी 53 वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच इमारतीत राहत होती. मुलीची आई कामावर जात असल्याने तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसल्यामुळे तिला आरोपीच्या घरी सोडत असे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अचानक मुलीने आईला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.