ती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं
मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
प्रथमेश तावडे, झी मीडिया : मुंबईतील (Mumbai) वसई (Vasai) जवळच्या नायगाव परिसरात एक अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या हत्येचा (Murder) उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणारी ही व्यक्ती असून कमरुद्दीन उस्मान अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमरुद्दीनच्या पत्नीसह तीन जणांना अटक केली आहे.
पतीच्या हत्येची शेजारच्याला सुपारी
मृत व्यक्तीचं नाव कमरुद्दीन असं आहे, तर त्याच्या पत्नीचं नाव अशिया अन्सारी असं आहे. गोरेगाव पूर्व इथल्या भगत सिंग चाळीत हे दाम्पत्य राहत होतं. आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी अशियाने शेजारी पाहणाऱ्या बिलाल पठाण आणि त्याची पत्नी सौफिया पठाण यांनाच हत्येची सुपारी दिली. यासाठी 1 लाख रुपये देण्याचं ठरलं.
कमरुद्दीनाला वसईत नेलं
बिलाल पठाण आणि सौफिया पठाण यांनी कमुरद्दीनला काम असल्याचं सांगून वसईतल्या नायगाव परिसरात नेलं. संधी मिळताच या दोघांनी कमरुद्दीनवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह तिथल्याच झाडीझुडपात फेकून दिला. पठाण पती-पतीने काम फत्ते झाल्याची माहिती कमरुद्दीनच्या पत्नीला दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अशिया अन्सारीने पोलिसात आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांना सापडला अज्ञात मृतदेह
27 जानेवारीला वालीव पोलिसांना अज्ञात मृतदेह सापडला, पण कोणताच पुरावा नसल्याने मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होतं. मात्र गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारिंचा शोध घेतला. अखेर त्यांना गोरेगाव इथल्या बांगूरनगर पोलीस ठाण्यातून मिसिंग तक्रार असल्याी माहिती मिळाली.
पोलिसांनी सुरु केला तपास
या एका माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी गोरेगाव इथलं त्याचं घर गाठलं. हा मृतदेह कमरुद्दीनचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील कमरुद्दीनच्या ओळखीच्या लोकांकडे तपास सुरु केला असता कमरुद्दीनच्या शेजारी राहणारे पती-पत्नी हत्या झाल्यापासून घरातून गायब असल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा : हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
अनैतिक संबंधातून हत्या
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पठाण पती-पत्नीला गुजरातमधल्या वापीमधून अटक केली. त्यांनी आपणच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. तसंच हत्या करण्यासाठी कमरुद्दीनच्या पत्नीनेच एक लाखाची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमरुद्दीनची पत्नी अशिया अन्सारी आणि तिचे शेजारी बिलाल पठाण आणि त्याची पत्नी सौफिया पठाण यांना अटक केली आहे.