Mira Bhayander : मिरा भाईंदरमध्ये पोलिसांवरच हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा भाईंदरमध्ये ड्रग्जची विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता जमावाने पोलिसांना मारहाण केली. यामध्ये एका महिला पोलिसाला थेट बाबंने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत महिला पोलीस जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला अटक करुन नेत असताना अमली पदार्थविरोधी शाखेच्या पोलीस पथकावर 13 ते 18 जणांच्या जमावाने बांबू आणि काठ्यांनी हल्ला चढवला. यामध्ये हल्लेखोरांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढून तिला बाबंने मारहाण करण्यात आला. तसेच महिला पोलिसाचा विनयभंग देखील करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे. 
  
मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी  भाईंदर येथील उत्तन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. राज्यात मोठ्या प्रमाणात सापडत असलेल्या ड्रग्ज साठ्यांमुळे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी नशा करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी शाखेचे पाच जणांचे पथक मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील धावगी डोंगर येथे गेले होते.  


पोलीस निरीक्षक अमर मराठे आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक उत्तन येथील सरकारी जागेत असलेल्या धावगी झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी हनीफ शेख नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक करुन त्याच्याकडून 32 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांचे पथक हनिफला पकडून नेत असताना 15 ते 20 जणांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामध्ये काही नशेबाज तरुण देखील होते. त्यानंतर जमावाने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक काही नशेबाजांनी महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी यांना बांबूने बेदम मारहाण केली. यासोबत त्यांचे केस देखील ओढत विनयभंग केला. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी लता या गंभीर जखमी झाल्या आहेत.


दरम्यान, या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा अब्बास अली मिर्झा ( 38) आणि अंकुर भारती (28) आणि राजू गौतम (19) या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीलासुद्धा ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणी अन्य पुरुष आणि महिला आरोपींचा शोध घेत आहेत.