Mumbai Crime : एका महिलेनं वृद्ध पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोडमध्ये (Mira Road) उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Mira Road Police) घटनास्थळी धाव घेऊन आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान या हत्येचं कारण समोर आलं आहे. गुरुवारी मीरा रोडच्या घरी पतीची हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नया नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गुप्ता (69) असे मृत व्यक्तीचे नाव असून राजकुमारी असे आरोपी पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य त्यांच्या 30 वर्षीय मुलासह मीरा रोड येथील आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. गुरुवारी सायंकाळी गुप्ता यांच्या फ्लॅटमधून ओरडण्याचा आवाज येत असल्यामुळे इमारतीतल्या सुरक्षा रक्षकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरात जाऊन पाहिले असता रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. तर पत्नी राजकुमारी त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. हा सगळा प्रकार पाहून शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलाला आणि पोलिसांना याची तात्काळ माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन राजकुमारी यांना अटक केली आणि त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. नैराश्यातून राजकुमारी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासानंतर समोर आली आहे. राजकुमारी या सध्या पोलीस कोठडीत आहेत. 


मुलाने काय सांगितलं?


सकाळी कामावर जाताना आई-वडिलांमध्ये कोणताही वाद झालेला नव्हता. शेजारच्यांनी सांगितल्यानंतर दुपारी 4.30 च्या सुमारास मी घरी परतलो, तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर आई एक शब्दही बोलली नाही, असे रमेश गुप्ता यांच्या मुलाने सांगितले.


दरम्यान, राजकुमारी यांनी पतीसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाद झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारी या नैराश्यात गेल्या होत्या. त्यांच्यावर त्यासंदर्भात उपचारही सुरू होते. गुप्ता यांचीही प्रकृती चांगली नव्हती. तपासादरम्यान आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसून ती नैराश्यात होती, त्यामुळे तिचे अनेकदा मयताशी भांडण होत असल्याचे समोर आले. मृत शर्मा यांच्या मुलाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी महिलेला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस राजकुमारी यांची वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.