मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. आर्यनला आजही दिलासा मिळालाच नाही. आर्यनसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई-गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. याआधी सर्व आरोपींना 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आर्यन खानबरोबरच अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchantt) आणि मुनमून धमेचा (Munmun Dhamecha) आणि इतर 7 आरोपींना यांना कोर्टात हजर करण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या अर्चित कुमारसमोर या सर्वांची चौकशी करायची आहे, म्हणून कस्टडी गरजेची असल्याचं एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी म्हटलं. आर्यन खानच्या चौकशीत अर्चित कुमारचं नाव आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, ते का संपर्कात होते याचा तपास करायचा आहे, गुन्ह्याचं गांभीर्य पाहता कस्टडी गरजेची असल्याचा युक्तीवाद अनिल सिंग यांनी केला.


दरम्यान, आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी अटक करण्यात आलेल्या आयोजकांशी आर्यनचा काहीही संबंध नसल्याचं न्यायालयात म्हटलं. प्रतीक हा आर्यनचा मित्र आहे, त्याने आर्यनची आयोजकांशी ओळख करुन दिली, आर्यनला VVIP म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं, इथे तेराशे लोक होते, पण अटक मात्र 17 जणांच करण्यात आली, असं मानेशिंदे यांनी म्हटलं.  आर्यनकडे ड्रग्स मिळालेले नाहीत, बॅगेतही काहीही सापडंल नाही, फोनशीही छेडछेडा करण्यात आलेली नाही, आर्यन चौकशीला सहकार्य करत आहे, त्याच्यावरील सेक्शनही गंभीर नाहीत, त्यामुळे आर्यनला अधिक कस्टडीची गरज नाही असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला.