`पेंग्विन पाळण्यापेक्षा जनतेची काळजी घ्या` नितेश राणेंचा टोला
`पेंग्विन आणि नाईट लाईफच्या मुद्याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा पालिकेत सत्ता असलेली शिवसेना खऱ्या जिवंत माणसांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही?
मुंबई : गुरूवारी 14 मार्च रोजी सायंकाळी 'सीएसएमटी' जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर 31 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन आणि इतर नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. 'पेंग्विन आणि नाईट लाईफच्या मुद्याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा पालिकेत सत्ता असलेली शिवसेना खऱ्या जिवंत माणसांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही? असा सवाल केला आहे. आता पुन्हा एकमेकांवर आरोप करत पूलाच्या ऑडिटसाठी चर्चा सुरू होईल. परंतु यातून काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत पालिका असूनही लोकांच्या जीवाची शून्य किंमत असल्याची' टीका नितेश राणे यांनी केली आहे.
'या दुर्घटनेनंतर काही लहान अधिकाऱ्यांचे निलंबन केले जाईल. कमला मिल, एल्फिन्स्टन पूल, घाटकोपर बिल्डिंग दुर्घटना यांसारख्या दुर्घटनेप्रमाणेच या पूलाचीही चौकशी करण्यात येईल. याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना का जबाबदार ठरविले जात नाही? महापौरांना राजीनामा देण्याबाबत का विचारले जात नाही? आता पुन्हा याबाबत केवळ चर्चा केली जाणार का? असा सवाल करत नितेश राणेंनी शिवसेना, पालिकेवर निशाणा साधला आहे.
गुरूवारी 14 मार्च रोजी सायंकाळी भरगर्दीच्या वेळी हिमालय पादचारी पूल कोसळला. 6 जणांचा मृत्यू तर 31 जण या दुर्घटनेत जखमी झाले. पूल कोसळल्याने पूलाच्या खाली उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर पूलाचे ऑडिट तसेच प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.