मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलनाला वेगळं वळण मिळालेलं असतानाच आता यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनीही आता महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णयच त्यांनी थेट खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याशी भेट घेऊन सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा आरक्षण मिळावं यासाठी मोठं जन आंदोलन करावं लागणार आहे. तसंच कायदेशीर मार्गानंही लढण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे, असं म्हणत या आंदोलनासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे असल्याचं सांगत मुंबई डबेवाहतुक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं अशी मागणीवजा विनंतीही त्यांनी केली. 


जवळपास १३० वर्षे जुन्या अशा एकमेव मराठमोळ्या मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळाचे  रामदास करवंदे, विनोद शेटे, जयसिंग पिंगळे यांनी रायगड येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वांसमक्ष ठेवला. 


भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या जनआंदोलनाची साद दिली तर, त्यावेळी मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळातील ५००० सदस्य आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही यावेळी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं संभाजीराजे यांना दिली.


 


हा विश्वास आणि आंदोनाप्रतीची भूमिका पाहता मुंबई डबेवाला संघटनेचं संभाजीराजे यांनी कौतुक केलं. मराठा क्रांती मोर्चातील त्यांचा सहभागही त्यांनी यावेळी अधोरेखित केला. शिवाय, डबेवाल्यांच्या प्रश्नांविषयी लवकरच राज्य आणि केंद्र सरकारची भेट घडवून आणून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.