धारावीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; मुंबईत मृतांचा आकडा २००० पार
धारावीत कोरोना व्हायरसने पुन्हा उसळी घेतली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या आटोक्यात आलेल्या धारावीत शुक्रवारी कोरोना व्हायरसने Coronavirus पुन्हा उसळी घेतली. गेल्या आठवडाभरापासून धारावीत २५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. तसेच मृत्यूदरही कमी झाला होता. त्यामुळे धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला, असे वाटत होते. मात्र, आज धारावीत कोरोनाचे २९ नवे रुग्ण आढळून आले. तसेच दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर येथील एकूण मृतांची संख्या ७७ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाच्या वर
याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या माहीम आणि दादरमध्येही आज अनुक्रमे १६ आणि १५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता हे सर्व परिसर येत असलेल्या जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ३२२९ इतकी झाली आहे.
महत्त्वाची सूचना: कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ऑफिसमध्ये 'इतके' तापमान ठेवा
तर संपूर्ण मुंबईत १३६६ नवे रुग्ण आढळून आले. तर आज दिवसभरात शहरातील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकट्या मुंबईतील कोरोनाच्या मृतांची संख्याही दोन हजाराच्या पलीकडे गेली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखाच्या पलीकडे गेली आहे. सध्या ४९,६१६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर ४७,७९६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.