डोंगरी इमारत दुर्घटना : आई वाचली, मात्र मुलांचा झाला अंत
डोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर.
मुंबई : डोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफच्या पथकाला एक आई आणि दोन मुले बिलगलेल्या अवस्थेत सापडली. आई आणि तिची ६ आणि ८ वर्षांची दोन मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. दरम्यान आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पण आईच्या कुशीत असणाऱ्या दोन्ही मुलाचा मात्र अंत झाला.
जखमी अवस्थेत असलेल्या आई आणि ६ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू होते. मात्र, त्या मुलाचा मृत्यू झाला. एनडीआरएफची टीम बचावकार्य करत असताना ही आई सातत्याने रडत होती. माझ्या मुलांना आधी ढिगाऱ्याखालून बाहेर काढा अशा विनवण्या ती करत होती. या तिघांना बाहेर काढताना एनडीआरएफटचे दल या आईला धीर देत देत तिघांना बाहेर काढण्याचे कठीण कार्य करत होते.
डोंगरी परिसरात केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.