Mumbai News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढणारी गर्दी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. इथं शहरावर असणारा लोकसंख्येचा भार वाढत असतानाच तिथे आता काही संकटांनी शहरात चाहूल दिल्याचं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणामध्येच एका नैसर्गिक आपत्तीनं मुंबईकरांच्या काळजाचं पाणी केलं. कारण, 22 सप्टेंबरला म्हणजेच शुक्रवारी शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या पालघरच्या समुद्रकिनारी क्षेत्रात भूकंपाचे हादरे जाणवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत माहितीनुसार पालघरच्या समुद्र क्षेत्रामध्ये आलेला हा भूकंप 3.8 रिश्टर स्केलचा होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस) या संस्थेकडून देण्यात आली. एनसीएसमधील तज्ज्ञ जे एल गौतम यांच्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 5 वाजून 19 मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या उत्तर पश्चिमेपासून साधारण 78 किमी दूर असणाऱ्या पालघरमधील समुद्राच्या किनाऱ्यापासून जवळच समुद्रात 10 किमी खोलीवर हा भूकंप आला होता. 


हेसुद्धा वाचा : Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द 


 


कोणतंही नुकसान नाही 


पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत या भूकंपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं स्रष्ट केलं. दरम्यान या भूकंपाची माहिती मिळतात डहाणूचे तलाठी अभिजीत देशमुख यांनीही अधिकच्या माहितीसाठी यंत्रणांशी संपर्क साधला. 


पालघरच्या समुद्रात आलेल्या या भूकंपाचे हादरे डहाणूच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या गावांमध्येही पाहायसा मिळाली. सध्याच्या घडीला समुद्रात गेलेल्या मासेमारांना सागरी पाणीपातळीत काही बदल आढळून आले का यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत असून, सध्या यंत्रणाही सतर्क असल्याचं स्पष्ट होत आहे. 


यापूर्वी यंदाच्याच वर्षी मार्च महिन्याच्या सुमारास मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रामध्येगी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं वृत्त समोर आलं होतं. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतरच आता पुन्हा एकदा आणखी एक धक्का. त्यातच मागील काही दिवसांपासून सुरु असणारं विविध देशांमधील भूकंपाचं सत्र पाहता ही कोणा मोठ्या संकटाची चाहूल तर नाही, यावर आता संबंधित यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.