Mumbai Boat Accident Vada Pav Connection: मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात स्पीड बोटने फेरी बोटला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धटकेमध्ये गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या 'नीलकमल' बोटीला जोरदार धडक दिल्याने ही बोट पटली. या बोटीमधील 10 पर्यटकांबरोबरच नौदलाच्या स्पीड बोटीवरील 3 जणांना जलसमाधी मिळाली. या बोटीवरील 98 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्या दिवशीही दोन बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. मात्र या बोट अपघातामध्ये मरण पावलेल्यांबरोबरच बचावलेल्यांसंदर्भातील धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच एक कुटुंब मुलाच्या हट्टापायी या अपघातातून वाचल्याची माहिती समोर आली आहे.


बोटीत चढणार इतक्याच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बोटमधून अलिफंटाला जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील अंजली त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण नीलकमल फेरीबोटीमधून लेणी पाहण्यासाठी जाणार होते. संपूर्ण कुटुंबाने या फेरीबोटची तिकीटं देखील काढली होती. ते बोटीमध्ये चढण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ पोहचलेही होते. मात्र ते बोटीत चढणार इतक्यात त्यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांनी मुंबईचा वडापाव खाण्याचा हट्ट धरला.


...अन् संपूर्ण कुटुंब वाचलं


चिमुकल्यांना वडापाव खायचा होता म्हणून सर्वांनीच वडापाव खाण्याचं ठरवलं आणि ते गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर असलेल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी थांबले. वडापावच्या या हट्टामुळे त्यांची फेरीबोट सुटली आणि त्यांच्यापैकी कोणीच या बोटवर चढू शकलं नाही. मुलांनी केलेल्या वडापावच्या हट्टामुळेच आमचं संपूर्ण कुटुंब या धक्कादायक अपघातामध्ये सापडलं नाही, असं अंजली त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या 15 रुपयांच्या वडापावने त्रिपाठी कुटुंबातील लाखमोलाचे जीव वाचवले असेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे.


नाशिकमधील संपूर्ण कुटुंब संपलं


समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये नाशिकमधील एक त्रिकोणी कुटुंबालाही जलसमाधी मिळाली आहे. हे कुटुंब रुग्णालयातील उपचारानंतर हवापालट म्हणून मुंबईत फिरायला आलेलं असतानाच एलिफंटा येथील लेणी पाहण्यासाठी जाणार होते. अपघातग्रस्त 'नीलकमल' बोटीमध्येच हे दांपत्य आणि त्यांचा चिमुकला मुलगाही सोबत होता. हे तिघेही या अपघातामध्ये मरण पावले आहेत.


सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा


नौदलाच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा अपघात नेमका का झाला यासंदर्भातील सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनीही केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.