डोक्यावर दरड, मुंबईकरांचा जीव मुठीत...प्रशासनाचा निष्काळीपणा ठरतोय मृत्यूला कारण?
Mumbai : मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका आणि प्रशासन नोटीस बजावून आपले हात झटकतात.. मात्र या दरडीच्या भीतीमध्ये अनेक मुंबईकर मृत्यूच्या छायेत आपलं जीवन जगताहेत.
मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : पावसाळा आला की दरवर्षी चर्चा होते ती मुंबईच्या दरडप्रवण (Landslides) भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची. पालिका प्रशासन आणि राज्य सरकार (State Government) पावसाळ्याच्या तोडावर केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडून हात वर करतात. इथला रहिवासी मात्र मृत्यूच्या छायेत पावसाळ्याचे दिवस ढकलत असतो. चुनाभट्टीच्या स्वदेशी मिल परिसरातील नागोबा चाळ, सय्यद बाबा चाळीतील नागरिक मागल्या अनेक वर्षांपासून हे भयाचं जगणं जगताहेत.
इथले रहिवासी दीपक हाडके यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या पदरी पडली केवळ निराशाच. तर साधना विरकर यांची कहाणी तर डोळ्यात पाणी आणणारी आहे.. साधना यांच्या घरावर दोन वर्षांपूर्वी दरड कोसळली होती. त्यातून त्या आणि त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं. मात्र त्यांना अद्याप काहीही मदत मिळाली नाहीय. मदतीची वाट बघून थकलेल्या साधना वीरकर गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर रोज आंदोलन करतायत.
कित्येक वर्षांपासून दरडीच्या भीतीपोटी मृत्यूच्या छायेत राहणारे अनेक नागरिक सरकारकडे नजरा लावून बसलेत. मायबाप सरकारने पुनर्वसन करावं किंवा स्थलांतर करावं एवढी या नागरिकांची मागणी आहे. केवळ सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा यातून मार्ग काढणं गरजेचं आहे.