मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि कधीही न झोपणारे शहर अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईवर आणखी एक आघात झाला आहे. दक्षिण मुंबईतील नेहमी वर्दळ असलेल्या या परिसरात हिमालय पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये ३१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणांचा गलथानपणा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही मुंबईत अशा दुर्घटना घडल्या होत्या. परंतु, या सगळ्यातून कोणताही धडा न घेता प्रशासकीय यंत्रणा ढिम्म राहिल्याने सहा मुंबईकरांना जीव गमवावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमालय पादचारी पूलावर गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये-जा सुरु होती. त्यावेळी धोकादायक अवस्थेत असलेल्या या पुलाचा लोखंडी अँगल अचानकपणे तुटला. त्यामुळे पुलाच्या मधल्या भागातील स्लॅब खाली कोसळला. यावेळी पुलावरून चालणारे प्रवासीही खाली पडले. हा पूल कोसळल्यानंतर या परिसरात जोरदार आवाज झाला, त्यापाठोपाठ सिमेंट-काँक्रिटचा धुरळा उडाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, थोड्याचवेळात परिस्थितीचे भान आल्यानंतर सर्वांनीच जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. रस्त्यावरील टॅक्सी, खासगी मोटारी, पोलिस गाड्या अशा मिळेल ती वाहने थांबवून अत्यवस्थ जखमींना जी. टी. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.




या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांमध्ये नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांनी जबाबदारी झटकत हात वर केले. दुर्घटनाग्रस्त पूल रेल्वेचाच असून त्याची दुरूस्ती मुंबई महानगरपालिका करत होती अशी माहिती, स्वतः मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. सोबतच पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेनं रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप महापौरांनी केला. 


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली. तसेच दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.