कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मुंबईमध्ये भरपावसात 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करीत हजारो गणेशभक्तांनी गौरींसह ६ दिवसांच्या गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. सकाळपासूनच गणेश भक्तांनी  गणेशमूर्तींची विधिवत पुजाअर्चा , धुपारती करून विसर्जनाला प्रारंभ केला. मुंबईतील जुहू, गिरगाव, दादर, माहीम चौपाटी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेने विसर्जन स्थळी गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती.पालिकेने वैद्यकीय पथक,घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारी, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी डंपर, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी , विसर्जनासाठी तराफे इत्यादी सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.


शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील समुद्र , तलाव ,खाडी आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी घरगुती ५५४० व सार्वजनिक ३२ , गौरी - ९३६ अशा एकूण  ६५०८  गणेश मूर्तीं व गौरींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यामध्ये, फक्त कृत्रिम तलावांत सार्वजनिक - ५  व घरगुती - ९५२ गौरी -१५२ अशा एकूण ११०९ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे.



पावसाला जोर 


साधारण गेल्या आठवडाभरापासून सुरु असणाऱ्या पावसाची रिपरिप काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शनिवारी रात्रभर मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची बॅटींग पाहायला मिळाली. मध्येच उसंत घेत पावसाचा जोर पुन्हापुन्हा वाढत होता. परिणामी मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पहाटेनंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. असं असलं तरीही आकाश मात्र निरभ्र नाही. त्यामुळे वरुणराजा रविवारच्या दिवशीही बरसण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. 


रात्रभर पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल या भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिणामी लालबागच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा काही प्रमाणात परिणामही झाला होता. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे गणेश भक्तांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला. ज्यामुळे आता या वरुणराजाला आतातरी विश्रांती घे, असंच साकडं भक्तगण आणि सबंध मुंबईकर करत आहेत.


काय आहे रेल्वे वाहतुकीची परिस्थिती? 


मुंबई आणि पश्चिम उपनगपरांमध्ये रात्रभर पाऊस सुरु असला तरीही त्याचे रेल्वे वाहतुकीवर मात्र फारसे परिणाम झालेले नाहीत. मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरु आहे. पण, मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा खोळंबा होत नसल्याची बाबही तितकीच महत्त्वाची आहे. फक्त मध्यच नव्हे, तर पश्चिम आणि हार्बर मार्गांवरील रेल्वे वाहतुकही सुरळीत सुरु आहे.