घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?
Mumbai Ghatkopar Hoarding Accident: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Who is Bhavesh Bhide, Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे (Bhavesh Bhide) असल्याची माहिती समोर आली आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं असून दुर्घटनेनंतर भावेश भिडे फरार आहे. मुंबईमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासहीत अवकाळी पाऊस पडला. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असल्याने घाटकोपरमधील हे महाकाय होर्डिंग बाजूच्या पेट्रोल पंपावर पडून त्याखाली अनेक लोक आडकले.
सोमवारी घाटकोपरमध्ये संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला तेव्हा पेट्रोल पंपावर 150 च्या आसपास दुचाकी आणि चारचाकी गाड्या होत्या असं सांगितलं जात आहे. 74 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 60 हून अधिक लोकांवर राजावाडी रुग्णालयात अपचार सुरु आहेत. या दुर्घटनेमध्ये एकूण 88 जणांना छोटी मोठी दुखापत झाली आहे. मात्र या दुर्घटनेस जबाबदार असलेला भावेश भिडे नेमका आहे तरी कोण हे पाहूयात...
> भावेश भिडे हा 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट'चा निर्देशक आहे. घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग याच कंपनीच्या मालकीचं आहे.
> 250 टन वजनाचं 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट'च्या मालकीचं हे बेकायदेशीर होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं आणि यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला.
> मान्सूपूर्व अवकाळी पाऊस सोमवारी मुंबईत झाला. या वेळी निर्माण झालेल्या वातावरण बदलामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत होते. वाऱ्यांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका होता.
> विभागीय पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.
> महानगरपालिकेने 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट' कंपनीला बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. 8 बेकायदेशीर होर्डिंग पुढील 10 दिवसांमध्ये काढावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. असं केलं नाही तर शहरातील 24 वॉर्डमध्ये होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल असं सांगितलं होतं.
> ज्या जमिनीवर हे होर्डिंग होतं ती जमीन गृह खातं आणि महाराष्ट्रा राज्य पोलीस हाऊसिंग वेल्फेअर कॉर्परेशनच्या मालकीची आहे. हे होर्डिंग बेकायदेशीरपणे उभं करण्यात आलं होतं.
> माजी आमदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वी बेकायदेशीर होर्डिंगविरुद्ध तक्रार केली होती. यामुळेच मुंबई महानगरपालिकेने रेल्वे पोलिसांना हे होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे.
> मुंबई महापालिकेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबर 2021 रोजी जीआरपी कमिशन कार्यालयामधून ही बेकायदेशीर होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा दावा केला आहे. सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल करण्यात आल्याचा दावाही केला.
> पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. या ठिकाणी 40 बाय 40 फुटांच्या होर्डिंगची परवानगी दिली जाते. मात्र जे होर्डिंग पडलं ते 120 बाय 120 स्वेअर फुटांचं होतं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या अपघातानंतर एन वॉर्डच्या कमिशनरने तातडीने जाहिरात कंपन्यांना या भागातील बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत.
> या दुर्घटनेनंतर भावेश भिडे हा त्याच्या कुटुंबासहीत फरार झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
> भावेश भिडेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो भाजपा आमदार राम कदम यांनी पोस्ट करत 'त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते,' असं म्हटलं आहे. आता भावेश भिडे कनेक्शनवरुन राजकारण सुरु झालं आहे.