मुंबई : मालाडच्या मैदानाच्या टिपू सुलतान नावावरून सुरू असलेलं भाजपचं आंदोलन उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेलं नामांतर कायदेशीर आहे का याबाबत पोलीस माहिती देणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर भाजपच्या विरोधाला न जुमानता अस्लम शेख यांनी मैदानाचं लोकार्पण केल्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. याठिकाणी भातखळकरांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मंगलप्रभात लोढाही या आंदोलनात सहभागी झाले होते.


अस्लम शेख यांचा दावा
टिपू सुलतान यांचे नाव एका मैदान देण्याचे काम एका भाजप नगरसेवकाने केले होते. हे नगरसेवक आता आमदार असून देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार का? असा खडा सवाल मंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.


तर भाजप आमदार अतुल भातखळकर आणि अमित साटम यांनी मंत्री अस्लम शेख यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, त्यांच्याकडे जर पुरावे असते तर त्यांनी थेट त्या नगरसेवकाचं नाव जाहीर केलं असतं. त्यामुळे अस्लम शेख खोटं बोलत असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं.


शिवसेनाही सरसावली
या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. मंत्री अस्लम शेख यांच्यावर टीका करताना भाजपने शिवसेनेवरही शरसंधान साधलं. त्यामुळे  शिवसेनेनंही आता भाजपला उत्तर दिलं आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी अस्लम शेख यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देत आणि पुरावे सादर करत महाविकास आघाडीचा धर्म पाळला. 


किशोरी पेडणेकर यांनी दिले पुरावे
'टिपू सुलतान नावाच्या प्रस्तावाला भाजपचं समर्थन होतं, 2001 आणि 2013मध्ये भाजपनेचं  प्रस्ताव मांडले होते, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. नगरसेवक असताना अमित साटम यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं असं सांगत किशोरी पेडणेकर यांनी पुरावे दाखवले. 


आपल्याकडे दोन पुरावे आहेत, जे महानगर पालिकेच्या माध्यमातून एफ पूर्व इथे टिपू सुलतानचं नाव दिलं, याला अमित साटम यांचं अनुमोदन असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.


भाजप करणार तक्रार
तर अस्लम शेख खोटं बोलत असून भाजप आमदार अमित साटम त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलीय. अस्लम शेख शंभर टक्के खोटं बोलत आहेत. कोणतीही कागदपत्र अस्लम शेख यांच्याकडे नाहीएत, हा तद्दन खोटा प्रचार असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.