मुंबईत संध्याकाळी सर्वाधिक रस्ते अपघात
रात्री ९ ते १२ दरम्यान सर्वाधिक अपघाती मृत्यू
मुंबई : मुंबईत संध्याकाळच्या सुमारास सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्घटनांची संख्या पाहता अपघातांची मुंबई असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मुंबईत संध्याकाळच्या वेळेस प्रवास करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही. लोकलने संध्याकाळी प्रवास करायचा म्हटलं तर तुफान गर्दी असते. रेटारेटी आणि धक्काबुक्कीमुळे रेल्वे प्रवासच नकोसा होतो. लोकलच्या डब्यात चढायला मिळेल याची हमी नाही. अनेक मुंबईकर प्रवाशांना दरवाजातून पडून आपला जीव गमवावा लागलाय. लोकलऐवजी रस्त्याने प्रवास करावा तर तेही सोपं राहिलेलं नाही. मुंबईतल्या काही रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मेट्रोच्या कामांमुळे त्यामध्ये अधिक भर पडलीय.
२०१८च्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत ३८६ अपघात झाले. यात ६३ मुंबईकरांनी जीव गमावला. तर रात्री ९ ते १२ या काळात ३४० अपघातात ७१ मुंबईकरांचा बळी गेला. दुपारी १२ ते ३ या काळात ३१२ अपघात झाले. ज्यामध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला. रात्री १२ ते पहाटे ३च्या दरम्यान २८१ अपघात झाले. त्यात ६४ जणांचा बळी गेलाय.
अपघातांच्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईतल्या रस्त्यांवर वाहनं चालवणं एवढं सोप्पं राहिलेलं नाही. त्यात पश्चिम उपनगरांमधील वांद्रे ते अंधेरी या भागात रेसिंग करणाऱ्या बाईकस्वारांची दहशत आहे. त्यांच्यामुळे अनेक अपघात झालेत. या अपघातातल्या बळींचा वयोगटही खूप काही सांगणारा आहे.
वर्षभरात १८ वर्षाखालील ३० जणांचा बळी गेला आहे. १९ ते २५ वयोगटातील १३७ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ ते ३५ वयोगटातील ८४ जणांचा बळी गेलाय. अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. अपघातांना खराब रस्ते, बेशिस्त वाहतूक आणि ड्रायव्हिंगमधील निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबईत गाडी चालवत असाल तर स्वतःला जपूनच गाडी चालवा.