Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे दाणादाण उडाली होती.  रात्री 1 ते आतापर्यंत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेला फटका बसला. इस्टर्न आणि एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे (Mumbaikar) प्रचंड हाल झाले. रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं.  हवामान विभागानं आजही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन महानगरपालिकेच्या प्रशासनानं केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांची सरकारवर टीका
मुंबईतील अतिवृष्टीचे पडसाद विधीमंडळ कामकाजावर झाल्याचं पहायला मिळालं. विधानसभा आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलीये. तर उद्या सभागृहाचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ट्वीट केलंय. 'मुख्यमंत्र्यांनी ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी केली. त्यांना पहिल्याच पावसानं त्यांच्या कामाची पावती दिलीये. केंद्रापासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी देखील पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केलीय.


'राजकारण करण्याचा दिवस नाही'
मुंबईत पाणी साचल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारण करण्यासाठी अनेक संधी आहे. हा तो दिवस नाही, असं शिंदे म्हणालेत. मुंबईकरांनी थोडं सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. 267 मिमी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट असून, लोकांची गैरसोय होणार नाही. अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, पाणी ट्रॅकवरून काढण्यासाठी सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.


उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
मुंबईतल्या पावसाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात माहिती दिलीये. सायन कुर्ला रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा जवळपास करण्यात आलाय. तर हार्बर मार्गावर हळू-हळू वाहतूक सुरू होतेय. तसंच पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरची वाहतूक 15 मिनिटे उशिरानं सुरू आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिलीये. तसंच मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याला पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.


पश्चिम विदर्भात ऑरेंज अलर्ट
पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. नागपूर प्रादेशिक वाहन विभागानं हा अलर्ट जारी केलाय.. या भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवलीये. तर बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला.