Mentally challenged Womens Pregnancy: मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलेला आई होण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. न्यायमूर्ती आर व्ही घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर 27 वर्षीय महिलेच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न केला. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि अविवाहित असल्याच्या कारणावरून एका महिलेचा 21 आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याची परवानगी मागण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती.


 'गर्भवती महिलेची संमती सर्वात महत्त्वाची'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेची मुंबईतील सरकारी जेजे रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याचे निर्देश खंडपीठाने गेल्या आठवड्यात  दिले होते. यानंतर वैद्यकीय मंडळाने बुधवारी यासंदर्भात अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार, ही महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा आजारी नाही. परंतु 75 टक्के बुद्ध्यांकासह किरकोळ बौद्धिक विकाराने ग्रस्त असल्याचे यात निष्पन्न झाले.  महिलेच्या पालकाने तिला कोणत्याही प्रकारचे मानसिक समुपदेशन किंवा उपचार दिले नाहीत. 2011 पासून तिला फक्त औषधोपचारावर ठेवले. तिच्या गर्भामध्ये कोणतीही विसंगती नाही आणि स्त्री गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे, असे वैद्यकीय मंडळाच्या अहवालात असे म्हटले आहे.  मात्र गर्भाचा गर्भपात केला जाऊ शकतो, असेही अहवालात म्हटले असल्याची माहिती खंडपीठाने दिली.अशा प्रकरणांमध्ये गर्भवती महिलेची संमती सर्वात महत्त्वाची असते, असे अतिरिक्त सरकारी वकील प्राची ताटके यांनी न्यायालयाला सांगितले. 


'या प्रकरणाला मानसिक विकार म्हणता येणार नाही'


वैद्यकीय मंडळाच्या अहवालात ती महिला मानसिकदृष्ट्या आजारी किंवा आजारी नसल्याचे स्पष्टपणे नमूद केल्याची नोंद खंडपीठाने घेतली. तिची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. कोणतीही व्यक्ती फार हुशार असू शकत नाही. आपण सर्व माणसे आहोत आणि प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले. तिची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असल्याने तिला आई बनण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला पालक बनण्याचा अधिकार नाही असे जर आपण म्हटले तर ते कायद्याच्या विरोधात असेल, असेही पुढे न्यायालयाने म्हटले.सध्याच्या प्रकरणातील गर्भवती महिलेला मानसिक आजारी घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाला मानसिक विकार म्हणता येणार नाही, असे खंडपीठाने म्हटले. महिलेने आता तिच्या पालकाला ती ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तसेच गर्भधारणेसाठी कोण जबाबदार आहे? त्याची ओळख सांगितली असल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने उच्च न्यायालयाला सांगितले.


पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी


संबंधित पुरुष हा तिच्याशी लग्न करायला तयार आहे का ते त्याला भेटून विचारावे. ते दोघेही प्रौढ आहेत, हा गुन्हा नाही. त्यामुळे पालक म्हणून पुढाकार घ्या आणि त्या व्यक्तीशी बोला, असे खंडपीठाने तिच्या पालकांना सांगितले.संबंधित महिला पाच महिन्यांची असताना तिला पालकांनी दत्तक घेतले होते. आता त्यांनी पालक म्हणून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असले सांगत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.