उच्च न्यायालयाने घेतली मराठा आंदोलनाची दखल; घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी येत्या १४ ऑगस्टला होणार होती.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यभरात सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी येत्या १४ ऑगस्टला होणार होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने दिलेला निर्वाणीचा इशारा आणि आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च न्यायालयाने ही सुनावणी आठवडाभर आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ७ ऑगस्टला उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होईल.
तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारची इच्छाशक्ती नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. या दिरंगाईमुळेच ५८ मूक मोर्चांनंतर आता या आंदोलनाचा भडका उडाला आहे, असे उदयनराजेंनी म्हटले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी लवकरच मराठा आरक्षण परिषद घेणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आमंत्रित करण्यात येईल. त्यामुळे मराठा आंदोलन कोणत्या दिशेने वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.