राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : मुंबईचा सगळ्यात आलिशान भाग समजला जाणाऱ्या कफ परेडमध्ये सगळ्यात मोठ्या एसआरए टॉवरचा मार्ग सुकर झाला आहे. सोमवारी सर्वोच्च तक्रार निवारण समितीने शापूरजी पालोनजी कंपनीला पुनर्विकासाची जबाबदारी द्यायचा एसआरएचा निर्णय कायम ठेवला. यामुळे कफ परेडमध्ये ४२ मजली एसआरए टॉवर होणार आहे. स्लम रिहॅबिलिटेशन स्कीमनुसार ही देशातली सगळ्यात मोठी इमारत असेल. आतापर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत जास्तीतजास्त २२ मजली इमारती बांधल्या गेल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसआरएने दिलेल्या माहितीनुसार कफ परेड भागात बाबासाहेब आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर आणि धोबीघाटमधल्या जवळपास २८ एकर जमिनीवरच्या ६ हजारांहून अधिक झोपड्यांचं वेगेवेगळ्या टप्प्यात पुनर्वसन केलं जाईल. या प्रोजेक्टमुळे पुढच्या काही वर्षात या भागातल्या ६० हजार जणांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


या प्रोजेक्टमध्ये ४२ मजली ७ टॉवर असणार आहेत. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला ३०० स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेला एक बीएचके फ्लॅट मिळणार आहे. या घराची किंमत जवळपास २ कोटी रुपये असेल. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना एसआरए अंतर्गत घरं देऊन उरलेल्या जमीनीवर १०० मजली रहिवासी टॉवर बनवण्याची योजना आहे. या प्रोजेक्टमुळे राज्य सरकारलाही हजारो कोटींचा फायदा होणार आहे.


एसआरएला या योजनेमुळे ९०० कोटी रुपयांची कमाई प्रिमियमच्या रुपात मिळेल. तर महसूल विभागाला जवळपास ३,२०० कोटी रुपये स्टॅम्प ड्यूटीचे मिळतील. याशिवाय मुंबई महापालिकेला मालमत्ता कराच्या रुपात वर्षाला १०० कोटी रुपयांची कमाई होईल.


या प्रोजेक्टशी जोडले गेलेले डॉ. राजेंद्र सिंग म्हणाले, 'या प्रोजेक्टमध्ये स्मार्ट सिटीची सगळी वैशिष्ट्यं असतील. इमारतींना सीसीटीव्ही, सुरक्षा, वायफाय, कचरा व्यवस्थापन, उर्जा व्यवस्थापन यांच्यासारख्या अनेक सुविधा असतील. याचसोबत ४ हजार गाड्या पार्क करण्याची सोयही असेल.'


मुंबईच्या कफ परेड भागात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. शहरातला सगळ्यात महागडा परिसर म्हणून कफ परेडची ओळख आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अनेक धनाड्य व्यक्ती कफ परेडला राहतात. आता या एसआरए योजनेमुळे झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्तीही कोट्यधीश होईल.