दीपाली जगताप पाटील झी मिडिया मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठ चर्चेत आहे ते निकालांच्या घोळामुळं आणि कुलगुरूंच्या हकालपट्टीमुळं. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके धिंडवडे निघाले. असे असले तरी, आज आम्ही दाखवणार आहोत मुंबई विद्यापीठातली एक आगळीवेगळी कहाणी. जी पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. ही कहाणी आहे एका विद्यार्थिनीच्या जिद्दीची.


शिक्षणाला वयाचे बंधन नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आहेत जयश्री केळकर... अवघं 71 वर्षांचं वय. त्या जेव्हा मुंबई विद्यापीठात येतात तेव्हा त्या निवृत्त प्राध्यापिका असतील, असं अनेकांना वाटतं. पण, त्या सगळ्यांचाच अंदाज चुकवतात. हातात पुस्तक, वही, पेन.. डोळ्यावर चष्मा असलेल्या जयश्री आजी चक्क मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. विशेष असे की, कोणत्याही वयात शिक्षण घेता येतं हे या अजीबाईंनी दाखवून दिलंय.  71 वर्षांच्या जयश्री केळकर यांनी नुकतंच पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आता मुंबई विद्यापीठात एमए इन मराठीसाठी प्रवेश घेतला आहे.


निवृत्तीनंतर पूर्ण केले शिक्षण


जयश्री यांचं शिक्षण जुन्या काळचं मॅट्रिक म्हणजे 11 वीपर्यंत झाल होतं. 1965 साली त्या अकरावी पास झाल्या. मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीलाही लागल्या...  आर्थिक ओढाताणीमुळं पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली... संसार, मुलं आणि नोकरी यासगळ्यात स्वत:च्या शिक्षणासाठी कधी वेळच देता आलं नाही. पण आयुष्याच्या उतारवयात जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा त्यांनी सर्वात आधी आपलं बीएचं शिक्षण पूर्ण केलं..


आता काळ बराच बदललाय


इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिक्षण घेण्यास सुरूवात केल्याबद्धल विचारले असता, केळकर आजी म्हणतात, 'मला माझ्या शाळेची आठवण येते. त्यावेळी शाळेत कसं होतं. खूप छान वाटतं, लहान मुली माझ्या मैत्रिणी आहेत. आमच्या काळात साडी नेसून शाळेत जावं लागायचं. पदर घ्यावा लागायचा. आता सगळंच बदलंय, वर्गात गेल्यावर 
सगळ्यांना असं वाटतं कोण आलंय. मुलं मला आजी किंवा आईच म्हणतात'.


झी 24 तासचा सलाम


इच्छा तिथं मार्ग किंवा केल्यानं होत आहे रे... आधी केलेचि पाहिजे... असं म्हणतात... तरूणपणी अधुरी राहिलेली शिक्षण घेण्याची इच्छा जयश्री केळकर अवघं पाऊणशे वयोमान झाल्यावर पूर्ण करतायत... त्यांच्या या जिद्दीला झी 24 तासचा सलाम...