भाजप आमदार राम कदम यांच्या मतदार संघात कंबलबाबाचे तथाकथित उपचार, अंनिसकडून कारवाईची मागणी
मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे.
देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया, मुंबई : भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam) एका बाबामुळे अडचणीत आले आहेत. कंबल अंगावर टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करण्यात येत असल्याचा दावा हा बाबा करतो. कंबलबाब (Kambalbaba) या नावाने हा बाबा ओळखला जात असून भाजप आमदार राम कदम यांनी राजस्थानहून (Rajashthan) या बाबाला आपल्या मतदार संघात लोकांवर उपचार करण्यासाठी बोलवालं होतं. आपल्या मतदारसंघातील विकलां नागरिकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी कंबलबाबाला बोलावल्याचं राम कदम यांचं म्हणणं आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ राम कदम यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता.
अर्धांगवाटूचा झटका येऊन शरीर लुळे पडलेले रुग्ण, कंबर किंवा गुडघ्याचे दुखणं असलेले रुग्ण आपल्या मतदार संघात येऊन उपचार घ्यावेत असं आवाहन राम कदम यांनी या व्हिडिओत केलं होतं. 11 सप्टेबरला हा कंबलबाबा भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात आला होता. यावेळी त्याच्याकडून उपचार करुन घेण्यासाटी अनेकांनी गर्दी केली होती. इतकंच नाही तर कंबलबाबांकडून केले जाणाऱ्या उपचाराचा व्हिडिओही राम कदम यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. मात्र, यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.
अंनिसची कारवाईची मागणी
कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात. गेली 10 वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे; या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास 1000 पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर,अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली आहे.
कोण आहे कंबलवाला बाबा
कंबलबाबा हा राजस्थानमधल्या राजसमंद जिल्ह्यातला आहे. असाध्य रोगांवर उपचार करण्याचा दावा करणारा कंबलबाबाने थेट वैद्यकीय शास्त्रालाच आव्हान दिलं आहे. कंबलबाबाचं खरं नाव गणेशभाई गुर्जर असं असन तो मुळचा गुजरातमधला आहे. वेगवेगळ्या राज्यात जाऊ 15-15 दिवसांचं शिबिर घेऊन तो लोकांवर उपचार करतो. कंबलचा स्पर्श झाल्याने किंवा बाबाचा हात लागल्याने लोकाचे आजार बरे होतात असा दावा केला जातो. पण या शिबिराला हजेरी लावलेल्या काही लोकांनी कोणताही आराम मिळाला नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.